
दौंड : प्रतिनिधी
पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पशुवैद्यकीय डॉक्टरने पत्नीसह आपल्या दोन मुलांचा खून करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील वरवंड येथे घडला आहे. शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून करून दोन मुलांना विहिरीत टाकून दिल्याचे आणि स्वत:ही आत्महत्या करत असल्याचे त्याने एका चिठ्ठीत नमूद केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील वरवंड येथील डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२) हे आपल्या कुटुंबियांसह गंगासागर पार्कमध्ये वास्तव्यास होते. आज दुपारी डॉ. दिवेकर यांच्यासह त्यांची पत्नी पल्लवी (वय ३५) यांचा मृतदेह राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. तर मुलगा अद्वित (वय ११), मुलगी वेदांतिका (वय ७) या दोघांना विहिरीत ढकलून जीवे मारण्यात आले आहे.
पत्नीकडून सातत्याने होणाऱ्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असून मुलांना गणेशवाडी येथील एका विहिरीत टाकल्याचे आणि पत्नीला गळा दाबून मारल्याचे डॉ. अतुल दिवेकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना दिवेकर पती-पत्नीचे मृतदेह मिळून आले आहेत. तर मुलांना ज्या विहिरीत ढकलले त्यामध्ये तब्बल ४५ फुटापर्यंत पाणी असल्यामुळे अद्याप मुलांचे मृतदेह मिळालेले नाहीत.
या घटनेनंतर दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. अतुल दिवेकर हे जनावरांचे डॉक्टर म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी पल्लवी या वरवंड येथील गोपीनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, दत्तात्रय टकले, हनुमंत भगत हे करीत आहेत.
‘ती’च्या त्रासाला कंटाळलो..
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांना डॉ. अतुल दिवेकर यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये मी माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळलो आहे. त्यामुळे तिला मारून टाकले असून माझ्या दोन मुलांना गणेशवाडी (ता. दौंड ) येथील जगताप विहिरीत टाकले आहे. तसेच मी स्वत:ही जीवन संपवत असल्याचे या चिठ्ठीत नमूद केले आहे.