मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समर्थन दिले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आता शरद पवार यांनीच स्पष्टीकरण देत या चर्चांना विराम दिला आहे. माझ्या निवृत्तीबद्दल मी अजित पवार यांना कल्पना दिली होती. त्यामुळे ते माझ्या निर्णयाला समर्थन देत होते असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
२ मे रोजी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून बाजूला होत असल्याचे जाहीर केले. यावेळी कार्यक्रमस्थळीच कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी झाली. हे सर्व होत असताना अजितदादांनी शरद पवार यांच्या निर्णयांचं समर्थन करत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यामुळे अजित पवार यांच्याबद्दल शंका-कुशंका उपस्थित केल्या गेल्या.
आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले. शरद पवार म्हणाले, माझ्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल मी अजित पवार यांना कल्पना दिली होती. त्यामुळे ज्या दिवशी मी हा निर्णय जाहीर केला तेव्हा त्यांनी माझ्या निर्णयाचे समर्थन केले. त्यात कोणतीही वेगळी भूमिका नव्हती.