मुंबई : प्रतिनिधी
तब्बल ऑक्टोबर महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये राज्य शासनाकडून विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांनी १५ एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हावं असं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्यापासून संप सुरु आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांशी अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पगारवाढीसह अन्य काही निर्णय घेतले. तरीही संप सुरुच आहे.
सध्या या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बुधवारी न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे. आम्ही आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत त्यांची बाजू ऐकली आहे. त्यामुळे १५ तारखेपूर्वी कामावर हजर व्हावं, त्यानंतर मात्र राज्य शासन कारवाई करु शकेल असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.