नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या आगीतील जखमींपैकी दोन महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत तब्बल १४ कर्मचारी जखमी असून त्यातील दोनजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत आज सकाळी भीषण आग लागली. कंपनीतील बॉयलरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. कंपनीत अडकलेल्या १४ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. उपचारादरम्यान दोन महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे येत आहे. उर्वरीत जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.
आज नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोटाचा आवाज झाला. त्यानंतर कंपनीत भीषण आग लागल्याचे समोर आले होते. कंपनीत आग लागली त्या ठिकाणी दहा ते पंधरा कामगार काम करत होते अशीही माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काहीजण अद्यापही आतमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाकडून तात्काळ मदतकार्य राबावण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिस यंत्रणेसह आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.