
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या वतीने लेक लाडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने धोरण आखले आहे. याच पार्श्वभूमीवर लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना जाहीर करण्यात आली. मुलींनी सक्षम व्हावे, स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म होईल त्या सरकारकडून कुटुंबाला एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पैसे मिळण्याचे टप्पे
मुलीचा जन्म झाल्यानंतर – ५ हजार रुपये
मुलगी पहिलीत गेल्यानंतर – ६ हजार रुपये
मुलगी सहावीत गेल्यानंतर – ७ हजार रुपये
मुलगी अकरावीमध्ये गेल्यानंतर – ८ हजार रुपये
मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर – ७५ हजार रुपये
मंत्रिमंडळ बैठकीमधील इतर निर्णय :
१. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण; मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार
२. सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
३. पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
४. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
५. भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन मिळणार