ठाणे : प्रतिनिधी
मागील काही दिवसांत वादग्रस्त ठरलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडत झालेल्या गदारोळप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटगृहात जाऊन शो बंद पाडत प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नुकतेच जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिवियाना मॉलमध्ये जाऊन ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडला होता. या दरम्यान आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि चित्रपटगृहातील प्रेक्षकांमध्ये शो बंद करण्यावरून झटापट झाली होती. त्यातच एका प्रेक्षकाला मारहाण झाली होती. या घटनेनंतर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.
आज दुपारी जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली. दरम्यान, मला नोटीस द्यायची असल्याचे सांगून अटक केली असून माझा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दुसरीकडे हर हर महादेव हा चित्रपट सध्या वादग्रस्त ठरत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवण्यात येत असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून होत आहे. त्यामुळे राज्यभरातून या चित्रपटाला विरोध वाढत आहे.