
मुंबई : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदूरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लिंगनिदान दाव्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता निवृत्तीमहाराज इंदूरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सत्र न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.
स्त्रीसंग सम तारखेला केल्यास मुलगा आणि विषम तारखेला केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य निवृत्तीमहाराज इंदूरीकर यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून अहमदनगरमधील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सत्र न्यायालयाकडून हा खटला रद्द करण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने इंदूरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून संगमनेर न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर इंदूरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात गुन्हा रद्द व्हावा यासाठी याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवत या प्रकरणी गुन्हा दाखल करून खटला चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यामुळे आता इंदूरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
निवृत्तीमहाराज इंदूरीकर हे ग्रामीण ढंगातील कीर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनाला सर्वदूर पसंती मिळते. सोशल मिडियातही इंदूरीकर महाराजांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या कीर्तनातून महिलांवर थेट भाष्य केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशातच स्त्रीसंग आणि त्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.