मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक आमदारांनी आपला मोर्चा गुवाहाटीकडे वळवला आहे. अशातच एकनाथ शिंदे हे राज्यपालांची भेट घेतील अशी चर्चा होत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून सहकारी आमदारांशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अशातच एकेक करत अनेक सेना आमदार एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत. त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे हे राज्यपालांची भेट घेवून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु करतील अशी चर्चा होत आहे.
या चर्चेवर आता एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. राज्यपालांच्या भेटीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत सहकारी आमदारांशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे तूर्तास तरी नव्या सत्तासमीकरणाची शक्यता धुसर झाली आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेच्या वतीने १२ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता सत्तेसाठी सुरु असलेला हा संघर्ष अधिकच रंगात येणार आहे.