मुंबई : प्रतिनिधी
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता तीन मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केल्याचं समजते.
काल विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर रात्रीच राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. एकनाथ शिंदे हे ११ आमदारांसह सुरतला गेले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेने आपले सर्व आमदार वर्षावर बोलावून घेतले आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या तीन मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला असून मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना, तर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना द्यावे अशीही मागणी केली असल्याचे समजते. शिवसेनेने कॉँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा घरोबा संपवावा अशीही मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांना बोलावून घेत बैठका सुरू केल्या आहेत. याच दरम्यान, शिवसेनेकडून दोन नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.