फलटण : प्रतिनिधी
फलटणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटणमधून बदली झालेल्या एका पोलिस निरीक्षकाने मद्यधुंद अवस्थेत बेफाम वेगात कार चालवत दोघाजणांना धडक दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, या पोलिस निरीक्षकाच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्यानंतर संतप्त जमावाने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. दरम्यान, या पोलिस निरीक्षकावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली असून दादासाहेब पवार असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शनिवारी रात्री पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार याने फलटण शहरातील दत्तनगर भागात बेफाम वेगात जात असताना दोघांना धडक दिली. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले.
हा प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यावेळी संबंधित पोलिस निरीक्षक हा मद्यधुंदावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी त्याच्या कारची तपासणी केली असता, त्यामध्ये दारूच्या बाटल्या मिळून आल्या. संतप्त जमावाने या पोलिस निरीक्षकाला चांगलाच चोप दिला. या अपघातात दोघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप फलटण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नाही.
दरम्यान, दादासाहेब पवार हा फलटणमध्ये नियुक्तीस होता. काही दिवसांपूर्वीच त्याची सातारा मुख्यालयात बदली झाली आहे. कालच्या प्रकारानंतर सातारा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता सातारा पोलिस या मद्यपी पोलिस निरीक्षकावर काय कारवाई करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.