सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. आज सकाळी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यानं थेट विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळत धनगर आरक्षणाबाबत निर्णय होत नसल्यानं निषेध व्यक्त केला आहे.
जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्यभरात विविध समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहे. मराठा समाजानंतर ओबीसी समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अशातच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक होऊ लागला आहे. त्यातूनच आज सोलापूरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळत निषेध व्यक्त केला आहे.
आज सकाळी राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात नागरिकांच्या भेटी घेत होते. या दरम्यान धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीबाबत एक निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाने भेट घेतली. त्याचवेळी शेखर बंगाळे या व्यक्तीने आपल्या खिशातून भंडारा काढत थेट विखे पाटील यांच्या अंगावर उधळला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाचा विषय ऐरणीवर असताना आता धनगर समाजही आक्रमक झाला आहे.