Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नवीन खेळी; शपथविधीपूर्वीच केला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर दावा..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह अन्य आमदारांचा समावेश झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्याकडेच सर्वाधिक आमदार असल्याचे दाखवून दिले आहे. अशातच आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे शपथविधीपूर्वीच ४० आमदारांच्या सह्यांचे निवेदन निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे.

रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर आज मुंबईतील एमईटी संस्थेत अजित पवार यांनी पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शक्तीप्रदर्शनही केले. या बैठकीत सर्वाधिक आमदारांनी हजेरी लावल्यामुळे अजित पवार यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यानच्या काळात, अजित पवार यांच्या गटाकडून ३० जून रोजीच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर दावा करण्यात आला आहे. याबाबत ४० आमदार आणि खासदारांच्या सह्यांचे निवेदनही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले असून पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनानुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा ठरावही देण्यात आला आहे.

दरम्यान, या याचिकेवर शरद पवार यांच्या गटाकडूनही पत्र पाठवण्यात आले असून आम्ही संबंधित शपथ घेणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करत असून आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय याबाबत निर्णय देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या याचिकेनंतर राजकीय पेच आणखी वाढला असून निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version