नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर आता घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या घटनापीठाकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण वर्ग केले असून गुरुवारी याबाबत सुनावणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडील सुनावणी स्थगित ठेवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आजच्या निर्णयांमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेतील बंडानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून ही सुनावणी लांबवण्यात आली होती. याबाबत आज सुनावणी ठेवण्यात आली होती. यामध्ये सातत्याने सुनावणीच्या तारखा लांबवल्या जात असल्याची बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत जवळपास पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. या सर्व याचिकांवर घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्यपालांचे शिंदे गटाला सरकार स्थापनेचे निमंत्रण यावर या घटनापीठापुढे सुनावणी केली जाणार आहे. या घटनापीठामध्ये पांच न्यायमूर्तींचा समावेश करण्यात आला असून गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आज घटनापीठ स्थापनेचा निर्णय घेतानाच निवडणूक आयोगाकडे दाखल असलेले प्रकरणही स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत पुढील सुनावणी घटनापीठापुढे होणार आहे. एकूणच आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.