मुंबई : प्रतिनिधी
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताचा तिढा दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघाताबद्दल संशय व्यक्त होत असून विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीही शंका उपस्थित करत चौकशीची मागणी केली. त्यामुळे आता या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीसाठी जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर मेटे यांच्या चालकाने तब्बल एक तास कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले होते. त्याचवेळी विविध संघटनांनी या अपघाताबद्दल संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. या दरम्यान, पोलिसांची आठ पथके चौकशीसाठी नेमण्यात आली.
मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी या अपघाताबद्दल संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. आपण चौकशीवर ठाम असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. दरम्यानच्या काळात, काही दिवसांपूर्वी मेटे यांच्या वाहनाचा पाठलाग झाल्याची बाबही समोर आली होती.
एकूणच या प्रकरणाचा गुंता वाढत असल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या अपघाताची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.