Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : समृद्धी महामार्गावर पूलाचा गर्डर कोसळून १७ कामगारांचा झाला मृत्यू; शहापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

ह्याचा प्रसार करा

शहापूर : प्रतिनिधी  

समृद्धी महामार्गावरील दुर्घटनांचं सत्र काही केल्या थांबत नाही. काल रात्री शहापूरनजीकच्या सरलांबे येथे समृद्धी महामार्गाच्या पूलाचं काम सुरू असताना गर्डरसह क्रेन कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले असून आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ५ लाख, तर केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री ११ ते १२ या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार, सरलांबे या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील पूलासाठी गर्डर बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी या क्रेनसह गर्डर कामगारांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये १७ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेत मदतकार्य राबवले. या घटनेत तीनजण जखमी झाले असून त्यांना शहापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबे गावाजवळ हे काम सुरू होते. नवयुगा कंपनीमार्फत हे काम केले जात आहे. या ठिकाणी ९० ते १२० फुट उंचीच्या उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी ही घटना घडली. सुरक्षेबाबत कोणतीही दक्षता घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत जवळपास १७ जणांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने ५ लाख आणि केंद्र सरकारने २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर या घटनेची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशीही माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेत मृत पावलेले सर्वच कामगार परप्रांतीय असल्याची माहितीही समोर आली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version