Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी माघारी घेण्यात येत असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीची चर्चा होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काल याबाबत प्रतिक्रिया देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचं आवाहन केलं होतं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला पत्र देत लटके यांना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.

काल रात्रीपासून भाजप नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर सकाळी भाजपने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही आपण पक्षाच्या आदेशानुसार माघार घेत असल्याचे सांगितले आहे.

निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा होती असं सांगत ऋतुजा लटके यांनी शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होत असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version