
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांना बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी प्रसिद्ध वकील अॅड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अवंती जायले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसात लेखी माफी न मागितल्यास गोपीचंद पडळकर यांना न्यायालयात खेचणार असा इशाराही यादव यांनी दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना नोटीस बजावली आहे. त्यामध्ये या वक्तव्यांप्रकरणी येत्या सात दिवसांत माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आमदार पडळकर पवार कुटुंबीयांच्या विरोधात वेळोवेळी जाणुनबूजुन बेताल वक्तव्य करतात. त्यातून नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. विशेष म्हणजे पडळकर यांनी विधानपरीषद निवडणुक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली असल्याचेही यादव यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस बजावली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची स्वतंत्रपणे लेखी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात दिवाणी,फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले.