मुंबई : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच आता राज्य शासनाने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे.
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिसांनी लाठीहल्ला करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमटले. त्याचवेळी आंदोलनाचा विषयही चांगलाच गाजला. त्यातूनच जरांगे यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी जरांगे यांची भेट घेत त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
दरम्यानच्या काळात राज्य शासनाने वंशावळ असलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय पारित केला. परंतु यात काही बदल करावेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी करत आंदोलनावर ठाम राहणे पसंत केले. त्यानंतरही राज्य शासनाकडून जरांगे यांच्याकडे काही प्रस्ताव पाठवण्यात आले. परंतु सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही त्यांची मागणी कायम आहे. अशातच त्यांनी पाणीही बंद करण्याचा निर्णय घेतला असून राज्य शासनाकडून दिले जाणारे उपचारही नाकारले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासह मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत जरांगे यांच्या आंदोलनासह मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.