
बारामती : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येवू नये अशी मागणी होत होती. आंदोलकांच्या भावनांचा आदर करत अजितदादांनी माळेगाव दौरा रद्द केला. त्यावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी माळेगावला न जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होता. परंतु सकल मराठा समाजाच्या वतीने अजित पवार यांनी गळीत हंगाम शुभारंभाला येऊ नये अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार यांनी आपला माळेगाव आणि बारामती दौरा रद्द करत पुण्याकडे जाणे पसंत केले. त्याचवेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचा आणि गळीत हंगाम ज्येष्ठ सभासद व महिलांच्या हस्ते करण्याचा निरोप पाठवला होता.
दरम्यानच्या काळात, मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाचं समर्थन केलं. लोकांची एखाद्या प्रश्नावर काही भावना असेल तर संघर्ष टाळणं हे शहाणपणाचं असतं. माझ्या मते अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.