
पुणे : प्रतिनिधी
मनसेला रामराम केलेल्या पुण्यातील रणरागिनी रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
स्थानिक नेत्यांच्या त्रासाला कंटाळून काल रुपाली पाटील यांनी मनसेच्या सर्व पदांच्या राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी आपल्याला विविध पक्षांच्या ऑफर असून नेमका प्रवेश कोणत्या पक्षात करणार याबद्दल संध्याकाळी माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
अपेक्षेनुसार रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.