
मुंबई : प्रतिनिधी
नुकतेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने श्रद्धांजली वाहत एक दिवसाचे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर राज्य शासनाने लतादीदींना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदय सामंत म्हणाले, माझ्या विभागाने मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय उभारण्याचे ठरवले होते. त्याचे मला समाधान आहे. नुकतेच लतादीदींचे निधन झाले. त्यामुळे आता भारतरत्न लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये तीन एकर जागेमध्ये भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने यासंदर्भात काम करण्याचे आदेश दिले आहेत. कालच लतादीदींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नंतर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.