
पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यात कोरोनामुळे घातलेले निर्बंध लवकरच शिथिल करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्के असून राज्याचा पॉझिटिव्ह ९ टक्के आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, १९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. शिवजयंती साजरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून नियमावलीत शिथिलता आणणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे.उद्धव ठाकरे यांना प्रवास करण्यात मनाई असल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.