Site icon Aapli Baramati News

Big Breaking : महाविकास आघाडीचा महत्वाचा निर्णय; आता सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्वच भाषिक शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य केल्यानंतर आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असणे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

आज मुंबईत मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,  गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. 

राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक  मराठी भाषेत लावण्यासंदर्भात आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. 

१० पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना, तसेच १० पेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापना अशा सर्वच आस्थापना देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे.  मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. 

तसेच ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष किंवा महनीय महिला यांची आणि गड किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतही आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version