अमरावती : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. प्रहार संघटनेचे नेते राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात मुंबईमधील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय न्यायालयाकडून त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही ठोकवण्यात आला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी संपत्तीची आयोग्य माहिती दिली आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या मुंबई येथील फ्लॅटची माहिती प्रतिज्ञापत्रात सादर केली नाही, असे आरोप करत अमरावतीमधील भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केला होती. याबाबत चांदूर बाजार प्रथमवर्ग न्यायालयात या खटल्यावर सुनावणी चालू होती.
अखेर चार वर्षांनी या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. बच्चू कडू यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्याने गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने बच्चू कडू यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या निर्णयाविरोधात बच्चू कडू हे उच्च न्यायालयामध्ये न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले.