अहमदनगर : प्रतिनिधी
पोलीस दलामध्ये लवकरच नवीन ७ हजार २०० पोलिसांची भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ५ हजार २०० नव्या पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून; ही पोलिसांची भरती झाल्यानंतर लगेच ७ हजार २०० नव्या पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
दिलीप वळसे-पाटील शुक्रवारी (दि.२८) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील ५ हजार २०० पोलिसांच्या भरतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी झाली असून ; अंतिम यादी यादी तयार करण्याचे काम चालू आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये ७ हजार २०० पोलिसांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या भरतीची प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस भरती संदर्भात माहिती दिली होती. राज्यातील पोलीस दलात पोलिसांचे बळ कमी पडत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळासमोर ५० हजार नव्या पोलिसांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ व त्या संदर्भात कार्यवाही करू, असे दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले होते.