
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या मुंबईतील घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. पहाटे ६ वाजता ईडीकडून त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. सुमारे दोन तासाच्या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या कार्यालयामध्ये आहेत.
पहाटे सहाच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरावर धाड टाकली. या धाडीमध्ये नवाब मलिक यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर साडेसातच्या सुमारास अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. अधिकारी नवाब मलिक यांना ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले आहेत. नवाब मलिक यांची दाऊद इब्राहिम मनिलाँड्रिंग प्रकरणात चौकशी चालू असल्याची माहिती समोर येत आहे.
नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे का? या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरामध्ये चौकशी केली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या इक्बाल कासकर आणि अन्य व्यक्तींचे अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली होती.