पुणे : प्रतिनिधी
‘ओमीक्रॉन व्हेरीएंट’चा धोका लक्षात घेऊन शासन विविध उपाययोजना राबवत आहे. अशातच पुणे शहरातून चिंताजनक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. या नागरीकाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान, यानंतर महानगरपालिका प्रशासन ‘अलर्ट’ झाले असून परदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या चांगलीच कमी झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र आता ‘ओमीक्रॉन’ या नवीन व्हेरीयंटचा धोका वाढल्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्यासह निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. सध्या या व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याला ओमीक्रॉन व्हेरीयंटची लागण झाली आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे. सद्यस्थितीत या नागरिकाला त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या विशेषत: दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ऑस्ट्रिया, झिंबाब्वे, जर्मनी, इस्राईलमधून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.