Site icon Aapli Baramati News

Big Breaking : जोपर्यंत कोरोना; तोपर्यंत मास्क वापरायचाच : अजितदादांनी ठणकावलं..!

ह्याचा प्रसार करा

मास्क मुक्तीची घोषणा स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन करू; तेव्हा बातम्या चालवा : माध्यमांना कानपिचक्या

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रिमंडळाची बैठक झाली की लगेचच मास्क मुक्तीची चर्चा सुरू होते. मास्क मुक्तीच्या बातम्या पसरवल्या जातात.  मात्र जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत मास्क वापरावाच लागणार आहे. मास्क मुक्ती करून चालणार नाही. मास्क मुक्तीबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाईल, त्यावेळी बातम्या चालवा, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील चैत्यभूमी परिसर, धोबी घाट, वरळी कोळीवाडा, नरिमन भाग जेट्टी आणि माहीम रेतीबंदर येथील विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

मुंबईमध्ये विकास कामे चालू आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात कशाप्रकारे कामे चालू आहेत ते बघायचे होते. आपल्यामुळे कोणालाही त्रास नको.  त्यामुळे कोणालाही न सांगता पाहणी दौरा केल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले असताना कोरोना काळात अडचणी न येता कामे झाली पाहिजेत.  लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत यावर आमचा भर आहे.

नवीन पिढीतील मंत्रिमंडळातील सहकारी आदित्य ठाकरे, आदिती तटकरे अशांना मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाने संधी दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे कामे केली आहेत. त्यांनी कोणालाही वाऱ्यावर सोडलेले नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

बऱ्याच ठिकाणी विकास कामे पाहत असताना झाडांची काळजी घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे पर्यावरण खाते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरणाविषयी अधिक सतर्क असतात. सगळ्या गोष्टींचा विचार करून कामे झाली आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महानगरपालिकेनेही अत्यंत चांगल्या प्रकारे मदत केली आहे,  अशा शब्दांत अजित पवार यांनी मुंबईत पाहणी केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version