
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील एमपीएससीच्या रिक्त जागांच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. त्यानुसार येत्या ३१ जुलैपर्यंत रिक्त झालेल्या सर्व जागा भरण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. रिक्त असलेल्या सर्व जागा कोणत्याही अडथळ्याविना भरल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पुण्यातील स्वप्नील लोणकर या एमपीएससी उत्तीर्ण तरुणाने आत्महत्या केली. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत या प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरल्या जातील, अशी घोषणा केली.
याबाबत बोलताना ना. अजित पवार म्हणाले, स्वप्नील लोणकर याने २०१९ मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली आणि त्याचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. १२०० जागांसाठी झालेल्या या परीक्षेमध्ये राज्यातील ३ हजार ६७१ उमेदवार पात्र ठरले. दरम्यानच्या काळात, एससीबीसी प्रवर्गासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी स्थगिती दिली. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबली.
सद्यस्थिती लक्षात घेता मंत्रीमंडळ बैठकीत याबद्दल गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सर्वांनीच या मुद्यावर आग्रही भूमिका मांडली असून सरकारही याबाबत गंभीर आहे. त्यानुसार येत्या ३१ जूलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरल्या जातील अशी घोषणा ना. अजित पवार यांनी केली. कोणत्याही अडथळ्याशिवाय या रिक्त जागा भरण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.