मुंबई : प्रतिनिधी
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमिर खान याने पत्नी किरण रावला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे एकत्रित प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. मात्र या जोडीने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दलची माहिती दिली आहे. १५ वर्षाच्या संसारात आम्ही दोघांनीही अनेक क्षण एकत्र हसत खेळत काढले, यातून अनेक अनुभवही घेतले. मात्र यानंतर आता आम्ही पती – पत्नी नसणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
१५ वर्षांमध्ये आमचं नातं हे आदर, विश्वास आणि प्रेमावर वाढलं होतं. पण आता आम्ही एक वेगळं आयुष्य जगायला सुरुवात करणार आहोत. ज्यात आम्ही पती – पत्नी नसू, परंतू एकमेकांच्या परिवारासाठी आणि मुलांसाठी आम्ही कायम हजर असू. काही दिवसांपासूनच आम्ही विभक्त होण्यासाठीची प्रक्रिया सुरु केली होती. ही प्रकिया आता अंतिम टप्प्यात आल्यानंतर ही बातमी आम्ही तुम्हाला देत आहोत असं आमिर आणि किरण राव यांनी सांगितले आहे.
पती आणि पत्नी म्हणून आमचं नात संपलं असलं तरीही आमचा मुलगा आझादसाठी आम्ही कायम आई-बाबा म्हणून हजर असणार आहोत असं किरण आणि आमिर यांनी स्पष्ट केलंय. पानी फाऊंडेशन, फिल्म प्रोजेक्टमध्येही आम्ही एकत्र काम करत राहू असं आमिर-किरणने नमूद केले आहे.