बुलढाणा : प्रतिनिधी
‘आमचे सरकार असताना कुठं झाले विलिनीकरण, रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक असतं, हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच त्यावर एकमेव पर्याय आहे’ अशा शब्दांत माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
बुलढाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर परखड मत मांडले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले, एसटीच्या विलीनिकरणाचा प्रश्न हा आमच्या सरकारच्या काळातही पुढे आला होता. त्यावेळी यावर कोणताच निर्णय झाला नाही. वास्तविक हा संपूर्ण सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यावर असताना एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं.
तुपकर हे चळवळीतील कार्यकर्ते असून कुठलीही माय बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही म्हणत तुपकर यांनी आंदोलन केले म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी आलो असेही जानकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आणि मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केलेले हे विधान म्हणजे भाजपसाठी घरचा आहेर ठरला आहे. एकीकडे भाजपचे नेते एसटी आंदोलनात सक्रिय झालेले असताना महादेव जानकर यांनी मात्र वास्तव पुढे आणून चांगलीच गोची केली आहे.