मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी केल्याच्या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. काही दिवसापूर्वीच खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अशातच अटकेत असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले नसल्याचा आणि त्यांनी कधीच पैसे मागितले नसल्याचा जबाब चांदीवाल आयोगासमोर नोंदवला आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यामार्फत महिन्याला १०० कोटी रुपये वसूली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनिल देशमुख अटकेत आहे .या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून आयोग नेमण्यात आला आहे.
चांदीवाल आयोगासमोर जबाब देताना सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरील आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. अनिल देशमुखांनी पैशाची मागणी कधीच केली नव्हती. दर महिन्याला शंभर रुपये खंडणी गोळा करण्याचे कुठलेच आदेश अनिल देशमुखांनी दिलेले नाहीत. शिवाय त्यांच्या कार्यालयातून कोणत्याच व्यक्तीकडून पैशाची मागणी करण्यात आलेली नव्हती. आपण कोणत्याच बार मालकाकडून पैसे गोळा केले नसल्याचे सांगत सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाला क्लीनचिट दिली आहे.