Site icon Aapli Baramati News

Big Breaking : अखेर नितेश राणे यांना जामीन मंजूर; सिंधुदुर्ग न्यायालयाने घातल्या या ‘अटी’

ह्याचा प्रसार करा

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना अखेर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाकडून नितेश राणे यांना काही अटी-शर्तींवर तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी पार पडली होती. त्यावर न्यायालयाने आज निकाल दिला.

नितेश राणे यांच्याकडून विधीज्ञ सतीश मानेशिंदे आणि संग्राम देसाई  यांनी युक्तिवाद केला तर सरकारी पक्षातर्फे प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. हांडे यांनी नितेश राणे यांचा  जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन मंजूर करताना नितेश राणे यांना काही अटी आणि शर्ती देण्यात आल्या असून त्यांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नितेश राणे यांना आठवड्यातून एकदा नियमित कणकवली पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लाववी लागणार आहे. तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहावे लागणार आहे. चार्जशीट दाखल होईपर्यंत; कणकवली तालुका हद्दीत प्रवेश करत येणार नाही. कणकवली बाहेर ज्या ठिकाणी राहणार आहेत तो पत्ता पोलिसांना द्यावा लागणार आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणे अटकेत होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळत हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मोठ्या घडामोडीनंतर अखेर त्यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राणे कुटुंबीयांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version