पुणे : प्रतिनिधी
नवीन वर्षाची सुरुवात होत असताना कोरोनासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोना झपाट्याने वाढत आहे. पाच दिवसांच्या अधिवेशन काळात १० मंत्र्यांसह २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा सध्याचा प्रसार लक्षात घेता प्रत्येकानेच काळजी घेत नियमांचे पालन केले पाहिजे. अन्यथा गरज पडली तर राज्यात आणखी कठोर निर्बंध लावावे लागतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक जयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोड, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार प्रकाश गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या काळात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोणतेही कार्यक्रम आयोजित करताना दक्षता घेणे आवश्यक आहे. नवीन आलेल्या विषाणूच्या प्रसाराचा वेग मोठा आहे. परदेशातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, आपण सर्वांनीच दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. अनेक जवळच्या सहकाऱ्यांना गमावलं आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आतापासूनच निर्बंध लागू केले आहेत.
राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. तिथूनच मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्यामुळे गरज पडली तर राज्य शासनाला आणखी कठोर निर्बंध लागू करावे लागतील असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. सरकार प्रत्येक पातळीवर दक्ष असून नांगरिकांनीही याबद्दल खबरदारी घेवून कोरोना नियमांचं पालन करावं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.