इंदापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर त्यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मागील आठवड्यातच त्यांचा मुंबईत विवाह झाला आहे. त्यानंतर आज त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबद्दल अंकिता पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
२८ डिसेंबर रोजी अंकिता पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांच्याशी विवाह झाला. मुंबईत झालेल्या या विवाह सोहळ्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर अंकिता पाटील यांचे वडील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत अंकिता पाटील यांनी ट्विटरवरून माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.अंकिता पाटील यांच्यावर मुंबईतच उपचार केले जाणार असून प्रकृती व्यवस्थित असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
मागील काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील दहा मंत्री आणि वीसपेक्षा अधिक आमदारांना सध्या कोरोनाने गाठले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.