मुंबई : प्रतिनिधी
कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आता राज्यांतील महाविद्यालये सुरू होणार आहेत.१ फेब्रुवारीपासून ऑफलाईन पद्धतीने विद्यालये सुरु होणार आहेत.
विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचा अधिकार असेल. त्याचबरोबर लशीचे दोन डोस पुर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. याच कालावधीत विद्यापीठाच्या परीक्षा असुन त्या १५ फेब्रुवारपर्यंत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्यांनतर परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन पद्धतीने घ्यायच्या याचा विचार केला जाईल.
सरकारने सर्वप्रथम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे महाविद्यालये कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. कोरोनामुळे महाविद्यालयाची दारे २ वर्षे बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आणखी काही दिवस विद्यालये बंद राहिली तर त्यांचे भविष्य संकटात येईल, म्हणून विद्यालय चालु करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत राज्यांत १ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत.