मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या राज्यात वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून १५ फेब्रुवारीनंतर परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांची बैठक पार पडली. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुरक्षिततेला महत्व देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत सुरू असलेल्या परीक्षा, त्याबाबतचे नियोजन याचाही आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.