मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने कहर घातला होता. तिसऱ्या लाटेबरोबरच ओमिक्रॉन विषाणूचे संकट राज्यावर होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन प्रत्येक राज्यातील तिसरी लाट आता ओसरू लागली आहे. त्यामुळे महाविद्यालय ऑफलाइन सुरू झालेली आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी कोरोना परिस्थिती अनुकूल आहे, त्या ठिकाणची महाविद्यालय पूर्ण क्षमतेने खुली करणार असल्याचे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
आज महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना उदय सामंत म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. जर यापुढे पूर्ण क्षमतेने किंवा ५० टक्के अधिक क्षमतेने वर्ग सुरू करायचे असतील तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विद्यापीठांचे कुलगुरु यांनी तशी सविस्तर चर्चा सुरु करावी. पूर्ण क्षमतेने महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आमच्याकडे पाठवावा.
प्रस्तावावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग नेमलेल्या तज्ञांशी चर्चा करेल. ज्या भागातील कोरोनाची परिस्थिती ठीक वाटली तर तेथील महाविद्यालयांना पूर्णवेळ सुरू करण्याबाबत परवानगी दिली जाईल असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.