मुंबई : प्रतिनिधी
दक्षिण आफ्रिकेत थैमान घातलेल्या ‘ओमीक्रॉन’ चा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाईन राहून पुन्हा तपासणी करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात परदेशातून आलेले काहीजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र त्यांचा ओमीक्रॉन तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. हायरिस्क असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
संबंधित प्रवाशी परदेशातून आल्यानंतर त्याची आरटीपीसीआर चाचणी करून सात दिवसांच्या विलगीकरणानंतर पुन्हा तपासणी करावी लागणार असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व ती दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनीही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.