मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या महिन्याभरापासून कोरोना आणि त्यानंतर न्यूमोनियावर उपचार सुरु होते.
मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर लता मंगेशकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
काल दिवसभरात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती. अखेर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.