मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षात कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत राज्यातील पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. ५५ वर्षांपवरील पोलिसांना घरूनच काम करण्यासंदर्भात आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. मात्र या परिस्थितीचा विचार न करता राज्यातील पोलिसांनी कर्तव्य बजावले आहे. संकट काळात फ्रंटवर काम करण्यात पोलिस नेहमीच पुढे असतात. त्यांना या संकट काळात कोणतीही सवलत मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गृह विभागाने ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी घरी राहून काय काय काम करायचे याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नसली तरी ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी हा निर्णय दिलासा देणारा आहे. मागील दोन वर्षात राज्यातील राज्यातील ९ हजार ५१० पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील तब्बल १२३ पोलिसांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात घेत गृह विभागाकडून वर्क फ्रॉम होमचा पर्याय काढण्यात आला आहे.