Site icon Aapli Baramati News

Big Breaking : आयकर विभागाची महाराष्ट्रात मोठी कारवाई, २४० कोटींची मालमत्ता आणि रोकड जप्त

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आयकर विभागाने महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.  या छाप्यात २४० कोटी रुपयांची मालमत्ता आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी, सरकारी कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग आणि ईडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमध्ये काही मोठे मासेही गळाला लागले आहेत.  या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात आयकर विभागाचे छापे सुरू झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाने गेल्या पाच दिवसांत उत्तर महाराष्ट्रात ३१  ठिकाणी छापे टाकले आहेत.

नाशिक, धुळे, नंदुरबार येथे टाकलेल्या या छाप्यांमध्ये सुमारे २४० कोटींची रोकड आणि मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  यामध्ये ६ कोटी रोख रक्कम आणि ५ कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे.  इतकी संपत्ती आणि रोख रक्कम कशी जमा झाली? आतापर्यंत या घोटाळ्यांकडे कोणाचेच लक्ष गेले नाही का असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अचानक पडलेल्या छाप्यांमुळे भूमाफिया, भ्रष्ट कंत्राटदार आणि बिल्डरांची चांगलीच धांदल उडाली. रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे बाहेर पडू लागल्यावर ते निघून गेले. जप्त केलेली रोकड, दागिने आणि कोट्यवधींचा माल मोजण्यासाठी १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या खजिन्याचा कोणताही समाधानकारक हिशेब संबंधितांना देता आला नाही. या छाप्यांमध्ये सोन्याची बिस्किटे, हिरे आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.  या कारवाईसाठी २२ वाहनांची सेवा घेण्यात आली असून १७४ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मिळून विविध ठिकाणी छापे टाकले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version