Site icon Aapli Baramati News

BARAMATI : राहुरीतील वकील दांपत्यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत वकिलांचं कामबंद आंदोलन

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राहुरी येथे  राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील दांपत्याचा खंडणीसाठी खून केल्याच्या निषधार्थ बारामती वकील संघटनेने आज न्यायालयीन कामापासून अलिप्त राहत निषेध नोंदवला. वकील संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार विलास करे यांना देण्यात आले. राज्यात सर्वत्र वकील दाम्पत्याच्या हत्येचे पडसाद उमटत असताना बारामती वकील संघटनेने वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त केला.

राहुरी तालुक्यातील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील दांपत्यांचा खंडणीसाठी खून करण्यात आला. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. आज बारामती वकील संघटनेने काम बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच न्यायालय परिसरात निषेधाच्या घोषणा देत या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज बारामती वकील संघटनेने बैठक घेवून अनेक ठराव मंजूर केले.

कोणत्याही सदस्याने त्या आरोपीचे वकीलपत्र घेवू नये, वकील संरक्षण कायदा त्वरीत पारीत करून त्याची अंमलबजावणी करावी, विधी तज्ञांना संरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत आणि वकिलांना २५ लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळण्यासाठी तरतूद व्हावी अशा मागण्या यावेळी या बैठकीत करण्यात आल्या.

नायब तहसीलदार विलास करे यांनी न्यायालयासमोर येत हे निवेदन स्वीकारले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उमेश काळे यानी एकजुटीने आपण सनदशीर मार्गाने लढा देणार असल्याचे सांगीतले. यावेळी उपाध्यक्ष काकासाहेब आटोळे, योगेश गाडेकर, शिवाजी भोई, राजेंद्र मासाळ  यांच्यासह ज्येष्ठ वकील अॅड. रमेश कोकरे, ॲड.नितीन भामे, अॅड. नंदकुमार भागवत, ॲड. संजन मोरे, ॲड. राजेंद्र काळे, ॲड.गणेश आळंदीकर, ॲड.अजित कोकरे, ॲड. शीतल देशमुख, ॲड. दत्तात्रय शिपकुले, महिला सदस्य ॲड.सोनाली मोरे, ॲड.कीर्ती गाढवे, ॲड.कांचन देवकाते, ॲड सीमा लोंढे आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version