बारामती : प्रतिनिधी
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी गेल्या तेरा दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. आज अखेर राज्य शासनाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. धनगर आरक्षण लढ्याचे जनक बी. के. कोकरे यांचे वडील खंडेराव कोकरे यांच्या हस्ते ज्यूस घेत चंद्रकांत वाघमोडे यांनी आले उपोषण मागे घेतले.
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर ९ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. राज्य शासनाने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समवेशाची अंमलबजावणी करावी ही त्यांची आग्रही मागणी होती. आज माजी खासदार विकास महात्मे यांनी वाघमोडे यांची भेट घेत त्यांची भूमिका जाणून घेतली.
राज्य शासनाकडे चंद्रकांत वाघमोडे यांच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार चर्चेनंतर आज सायंकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी लेखी पत्र देत राज्य शासन याबाबत बैठक आयोजित करेल असे आश्वासित केले. राज्य शासन धनगर समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असून आपल्या मागण्यांबाबत बैठक आयोजित करून त्यामध्ये निर्णय घेतला जाईल असे त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
धनगर आरक्षण चळवळीचे जनक बी. के. कोकरे यांचे वडील खंडेराव कोकरे यांच्या हस्ते ज्यूस घेत चंद्रकांत वाघमोडे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी माजी खासदार विकास महात्मे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे उपस्थित होते.
चंद्रकांत वाघमोडे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपस्थित समाज बांधवांनी एकच घोषणाबाजी केली. धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने मुदत मागितली आहे. या कालावधीत आपण राज्यभर फिरून आरक्षणाबाबत जनजागृती करणार असल्याचं चंद्रकांत वाघमोडे यांनी सांगितलं. तसेच दिलेल्या वेळेत याबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचेही वाघमोडे यांनी जाहीर केलं.