
बारामती : प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर धनगर आरक्षणाचा विषयही ऐरणीवर आला आहे. अशातच बारामतीतील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी येत्या दोन दिवसांत आरक्षणाच्या विषयावर निर्णय न झाल्यास २० सप्टेंबर रोजी खांबाटकी घाट अडवण्याचं आंदोलन होताच आत्महत्या करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
धनगर समाजाच्या आरक्षण चळवळीत कार्यरत असलेले किशोर मासाळ यांच्यावर नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात महादेव जानकर यांच्यासोबतही काम केले आहे. आज त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून धनगर आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवले आहे. प्रत्यक्षात आरक्षणाचा निर्णय आजवर घेतला गेला नाही. त्यामुळे मला आता जगण्याची इच्छा राहिली नसून येत्या दोन दिवसांत आरक्षणावर निर्णय न झाल्यास २० सप्टेंबर रोजी खांबाटकी घाटातील आंदोलनानंतर आत्महत्या करणार असल्याचे मासाळ यांनी म्हटले आहे. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास माझ्या जीवाचं जे काही बरं वाईट होईल त्याला सरकार जबाबदार असेल असंही किशोर मासाळ यांनी नमूद केलं आहे.
एकीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. अशातच चौंडीत धनगर समाजाने आरक्षणासाठी आक्रमक लढा सुरू केला आहे. त्यात आता बारामतीतून राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या किशोर मासाळ यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शासन याबाबत काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागले आहे.