मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारमधील किमान १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार केवळ धमक्या देत आहे. आमचा कोणी दोषी असेल तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल. जेलमध्ये असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. परंतु सरकारी नोकराला अटक केल्यावर त्याला २४ तासात निलंबित करावे लागते, असा नियम आहे. तुम्ही तुम्ही नियमानुसार चालत आहात का ? असा प्रश्न त्यांनी विचारला.
ठाकरे सरकारमधील काहीजण सुपात आहेत, तर काहीजण जात्यात आहेत. सुपात असणारे जात्यात जाणार असून सगळ्यांचे पीठ होणार आहे. जशी नावे येतील तशी कारवाई केली जाईल. केंद्रीय पर्यावरण खात्याने राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी येथील रिसॉर्टबाबत तक्रार दिली आहे. त्यामुळे किमान १० जणांना नैतिकता असेल तर किंवा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागणार असल्याचं पाटील यांनी सांगितले.