
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या पावसाचे वातावरण असल्याने, नागरिकांची तसेच पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांचे टोल माफ करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे काही निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे पायी वारीही झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर यावर्षी वारकऱ्यांना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये याबाबत सूचना करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ केला जाणार असून त्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
वारकरी दिंड्यांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आषाढीसाठी लागणारा निधी कमी पडणार नाही असेही ते म्हणाले. वारीच्या पार्श्वभूमीवर ४ हजार ७०० बसेस सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.