Site icon Aapli Baramati News

राज्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना असंवेदनशील सत्ताधारी हार-तुरे, सत्कारात मश्गुल : अजितदादांचं टिकास्त्र

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून राज्यातील बहुतांश भाग अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बेहाल आहे, लाखो हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे, पूराच्या पाण्याने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे, हजारो जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत, अनेक घरांची पडझड झाली आहे, अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. राज्यावर अभूतपूर्व असे नैसर्गिक संकट आले असताना असंवेदनशील शिंदे सरकार हार-तुरे आणि सत्कार घेण्यात मश्गूल आहे, असा घणाघात करत राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय विरोधी पक्ष स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधान सभा सभागृहात सत्ताधाऱ्यांना दिला.

विधानसभा सभागृहात नियम २९३ अन्वयेच्या ‘अतिवृष्टीने राज्यात झालेल्या नुकसानी’च्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यावर कोणतेही संकट आले तर संकटग्रस्तांची सर्वात पहिली अपेक्षा सरकारकडून असते, मात्र आपत्तीच्या काळात राज्यातील जनतेला मदत करण्यात, धीर देण्यात शिंदे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या महिनाभरापासून अधिकच्या कालावधीपासून राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीने थैमान घातले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील, विशेषत: विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागातील जवळपास १५ लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पूर्ण पंचनामे झालेले नाहीत, काही जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरु आहे, त्यामुळे नुकसानीचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आम्ही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली.  शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि व्यथा जाणून घेतल्या. प्रशासनाशी चर्चा केली, नुकसानीचा अंदाज घेतला. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये हजारो जनावरांसह गोठ्यातील चारा व खतेही वाहून गेली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे पीक कर्ज घेतले, पण पीक वाहून गेल्यामुळे पीक कर्ज भरणे शक्य होणार नाही.  त्यामुळे हे संपूर्ण कर्ज माफी करण्याची आवश्यकता आहे. अतिवृष्टीमुळे अनेक विहिरींची पडझड झाली, काही वाहून गेल्या, काही खचल्या आहेत.  या सर्व विहिरींच्या डागडुजीसाठी मनरेगामधून विशेषबाब म्हणून परवानगी आणि निधी देण्याची आवश्यकता आहे. ठिबक आणि तुषार संचात गाळ जाऊन नादुरुस्त झाले, हजारो शेतकऱ्यांच्या मोटारी जळाल्या, जमिनी खरडून गेल्या, हजारो हेक्टर शेती नापिकी होण्याची आज भीती शेतकऱ्यांच्या मनात असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

राज्यातील आदिवासी पट्टयात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान होऊन प्रामुख्याने भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. आदिवासी बांधवांना रोख स्वरुपात खावटी अनुदान तातडीने देण्यात याव. ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’चे निकष कालबाह्य झाले असून ते बदलण्याचे आवश्यकता आहेत. याबाबत देशाच्या सन्माननीय पंतप्रधान महोदयांकडे राज्याचे शिष्टमंडळ जाऊन आले होते, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होतो. आता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version