Site icon Aapli Baramati News

तासगाव दौऱ्यात अजितदादांची अंगरक्षकाच्या घरी सदिच्छा भेट; दादांच्या आपुलकीनं पवार कुटुंबीय भारावलं..!

ह्याचा प्रसार करा

सांगली : प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाने प्रसिद्ध आहेत. मात्र काही प्रसंगातून त्यांच्यातील संवेदनशीलपणा, आपुलकी जपणारा स्वभाव पहायला मिळतो.. अजितदादा आज एका विवाह सोहळ्यासाठी तासगावमध्ये आले होते.. तत्पूर्वी त्यांचे मुंबईतील अंगरक्षक सिद्धेश पवार यांनी तासगाव येथील आपल्या घरी येण्याची विनंती केली.. दादांनी ही विनंती तर मान्यच केली मात्र पवार कुटुंबीयांसोबत तब्बल पाऊण तास वेळ घालवत त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधला.. अजितदादांच्या या आगळ्यावेगळ्या भेटीनं पवार कुटुंबीय भारावून गेलं.. 

तासगाव येथील रहिवाशी असलेले सिद्धेश पवार हे मुंबईत विशेष सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. ते अजितदादांच्या सुरक्षा ताफ्यात असतात. अजितदादा एका विवाह सोहळ्यासाठी तासगावला जात असल्याची बाब त्यांना समजली. त्यांनी दादांना भेटत आपल्या तासगाव येथील घरी येण्याची विनंती केली.. दादांनीही तात्काळ मी माझ्या अंगरक्षकाच्या घरी जाणार असं सांगत संबंधितांना सुचनाही दिल्या..

आज सिद्धेश पवार यांच्या घरी गेल्यानंतर दादांनी आपुलकीनं पवार कुटुंबीयांशी संवाद साधला. सिद्धेश पवार यांचे आई-वडील, भाऊ आणि कुटुबीयांची आपुलकीनं चौकशी केली. जवळपास पाऊण तासाच्या या भेटीत दादांनी सिद्धेश पवार यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती घेतली. त्यांच्या बंधूंच्या व्यवसायाबद्दल जाणून घेत त्यांना शुभेच्छाही दिल्या. 

राज्याचं उपमुख्यमंत्रीपद असताना कोणताही बडेजाव न करता अजितदादांनी या कुटुंबीयांशी संवाद साधला..  इतकंच नाही तर आपले अंगरक्षक सिद्धेश पवार यांचंही त्यांच्या आईवडिलांकडे कौतुक केलं. ही सदिच्छा भेट पवार कुटुंबियांसाठी आनंददायी तर ठरलीच, मात्र आपल्या कार्यालयातील अंगरक्षकाबद्दल अजितदादांना असणाऱ्या आपुलकीची प्रचिती देणारीही होती. 

या भेटीनंतर आनंदून गेलेल्या सिद्धेश पवार यांच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले. दादांनी आपल्या घरी यावं ही इच्छा तर पूर्ण झालीच. मात्र त्यांचा संवेदनशील आणि आपुलकी जपणारा स्वभाव अनुभवायला मिळाल्यानं पवार कुटुंबीयांचा आनंद शब्दातीत होता असं सांगायला सिद्धेश पवार विसरले नाहीत.

सातत्यानं कामाचा झपाटा, जनहिताची कामे यात व्यस्त असणारे अजितदादा कडक स्वभावाचे वाटतात. मात्र त्यांचा आगळावेगळा स्वभाव अनुभवल्यानंतर ते वज्राहून कठोर अन मेणाहून मऊ आहेत हे आपोआप दिसून येतं.. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version