
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. पहाटे ६ वाजताच अजितदादांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करत त्यांनी अधिकारी व ठेकेदारांसह पदाधिकाऱ्यांनाही सुचना केल्या.
अजितदादांनी आज नेहमीप्रमाणे भल्या पहाटे आपल्या कामाचा धडाका सुरु केला. बारामती शहरातील विविध विकासकामांना भेटी देत त्यांनी आढावा घेतला. विकासकामे दर्जेदार करण्याबरोबरच वेळेत पूर्ण करावीत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहिजे यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या दौऱ्यात अजितदादांनी मेडद येथील आयुर्वेद महाविद्यालय, बाबूजी नाईक वाडा, दशक्रिया विधी घाट, कऱ्हा नदी पूल, बसस्थानक, चिल्ड्रन पार्क अशा विविध विकासकामांची पाहणी केली. या कामांची माहिती घेत आवश्यक त्या सुचना दिल्या.
या दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, तसेच पदाधिकारी सहभागी झाले होते. नागरीकांनीही विकासकामे होत असताना आपली जबाबदारी लक्षात घेवून त्या कामांची निगा राखली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.